राजापूर तालुक्यातील दांडे -अणसुरे पुलाचे काम पूर्ण न झाल्यास आंदोलन
राजापूर तालुक्यातील दांडे -अणसुरे पुलाच्या दुरूस्तीचे काम गेले वर्षभर अत्यंत संथ गतीने सुरू असताना वाहनचालक, नागरिक यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनीही आवाज उठवून देखील अद्याप कामाला गती प्राप्त झालेली नाही. फेब्रुवारी महिन्यात काम पूर्ण होईल असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र आता मे महिना संपत आला तरी पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात पुलाचे काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.गतवर्षी मार्च महिन्यापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करून दुरूस्तीचे काम एक खासगी कंपनी करीत आहे. मुळ पुलाच्या जागी असलेला भराव हटवून एक खांब वाढवून पुलाची लांबी वाढविली आहे. यासाठी अपेक्षित कालावधी तीन महिन्याचा असतानाही वर्षभराचा कालावधी लोटला तरी पुल वाहतुकीसाठी सुरू न झाल्याने दोन्हीही जिल्ह्यातील वाहनचालक व जनतेला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. www.konkantoday.com