कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसचे थांबे रद्द केल्याने प्रवाशांना शारीरिक आणि मानसिक त्रास
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)च्या फलाट क्रमांक १०-११ चे विस्तारीकरणाच्या कामानिमित्त ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात मोठा बदल केला असून त्यामुळे लोकल रेल्वेच्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसचे थांबे रद्द केल्याने प्रवाशांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.मध्य रेल्वेवर सीएसएमटीच्या फलाटांचा विस्तार करण्यासाठी १७ मेपासून ते १ जूनपर्यंत दररोज रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सहा तासांचा ब्लॉक आहे. त्यामुळे मध्य आणि कोकण रेल्वेवरून धावणारी सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेल स्थानकातून सुटेल आणि मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस पनवेलपर्यंतच चालविण्यात येईल, अशी माहिती मध्य, कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे सहकुटुंब कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून येणारे प्रवासी हवालदिल झाले आहेत. मांडवी एक्स्प्रेसचे सीएसएमटीपर्यंत आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांना पनवेलला उतरावे लागत आहे. मांडवी एक्स्प्रेस उशिरा धावत असल्याने प्रवाशांना नियोजितस्थळी पोहोचण्यास उशीर होत आहे.www.konkantoday.com