वाढती गर्दी लक्षात घेवून जादा रेल्वे लोकल गाड्या चालू करा -शौकत मुकादम
कोकण रेल्वे मार्गावर लोकल गाड्या कमी असल्यामुळे प्रवाशांची झुंबड उडाली आहे. व प्रवास करताना प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. शौचालयापासून पायरीपर्यंत प्रवाशांना उभे रहावे लागत आहे. गणपती सण जवळ आला आहे. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोकण रेल्वे मार्गावर जादाच्या लोकल गाड्या चालवणे आवश्यक आहे. कोरोना पूर्वी अंजनी, कामथे येथे लोकल गाड्यांना थांबे होते तेही आता बंद करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. कोकण रेल्वे फायद्यात आणायची आहे, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांचे म्हणणे आहे. गाड्यांची संख्या कमी आहे तर रेल्वे फायद्यात कशी येईल, असे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला पत्राद्वारे कळविले आहे.सदरच्या पत्रामध्ये मुकादम यांनी पुढे म्हटले आहे की, चिपळूण रेल्वे स्टेशनवर प्लॅट फॉर्मवर जे नंबर टाकण्यात आले आहेत त्या नंबरवर रेल्वे डबे थांबत नसून चुकीच्या नंबरवर मागे पुढे थांबत असल्यामुळे मुंबईकडे जाणार्या प्रवाशांची धावपळ होत आहे. चाकरमानी कोकणातून मुंबईकडे जात असताना हापूस आंबा, फणस व तांदळाचे बाजके घेवून जात असतात परंतु त्या त्या प्लॅट फॉर्मवर त्या त्या नंबराचे रेल्वेचे डबे मागे पुढे थांबत असल्यामुळे प्रवाशांना ओझे घेवून इकडे तिकडे धावपळ करावी लागत आहे. www.konkantoday.com