
चाफेरी ग्रामस्थ आणि ठाकरे शिवसेनेच्या दणक्यानंतर रिंगी फाटा ते सांडेलावगण रस्त्याच्या कामाला सुरुवात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंत्यांकडून आंदोलन स्थगित करण्याची विनंती.
रत्नागिरी : चाफेरी कासारी सांडेलावगण रस्त्याच्या कामाबाबत आक्रमक झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आंदोलनांच्या इशाऱ्याची गंभीर दखल महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांनी घेतली असून, या रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात केली आहे. कालपासून (१० एप्रिल) रस्त्यांवरील मोत्यांचे पाईप टाकण्यास सुरुवात झाली असून, खडीकरणासाठी लागणारी खडी साईटवर गोळा करण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे १५ एप्रिल रोजी करत असलेले आंदोलन स्थगित करण्याची विनंती कार्यकारी अभियंता यांनी एका पत्राद्वारे केली आहे.रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी, कासारी, सांडेलावगण अंतर्गत रस्ता सन २०२२ मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. ६.३७ किलोमीटर अंतराचा हा रस्ता असून याठिकाणी सुमारे २ हजार ५०० लोकवस्ती आहे.
या रस्त्याचे काम पूर्ण होण्याचा कालावधी १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत होता; मात्र संबंधित ठेकेदाराने २०२४ मे महिन्याच्या शेवटी रस्ता रुंदीकरणाचे काम चालू केले. त्यानंतर पावसाळ्यात काम बंद होते. नोव्हेंबर महिन्यात पाऊस गेल्यानंतर आज अखेरपर्यंत या ठेकेदाराने पुढील काम चालू केलेले नाही.रस्त्याची स्थिती पाहता या रस्त्यावरून वाहनाने एखादा आजारी रुग्णही नेता येणार नाही. रिक्षाही या ठिकाणापर्यंत जात नाही. तसेच या रस्त्याला कायमस्वरूपी अपघात होत असतात. त्यामुळे आता लोकांचे वाहतुकीच्या दृष्टीने जगणे अवघड होत चालले आहे.याबाबत चाफेरी गावच्या सरपंचांसह अन्य ग्रामस्थांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन रस्त्याबाबत विचारणा केली होती; मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणची पाहणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले होते. याची कैफियत चाफेरी ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे मांडली होती.
ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली होती. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदनही सादर केले होते. तसेच रस्ता लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ग्रामस्थांसह 15 एप्रिल रोजी आंदोलन पुकारे असा इशारा देण्यात आला होता.या इशाऱ्याची गंभीर दखल महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांनी घेतली. याबाबत ग्रामपंचायत इला उद्देशून दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “चाफेरी कासारी सांडेलावगण हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-३ मध्ये मंजूर असून याचा मक्ता आर. डी. सामंत प्रा.लि. यांच्या नावे आहे. हे काम मुदतीत सुरू करून रस्त्याच्या काही लांबीमध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात आले.
संदर्भ क्र. २ नुसार १७ मार्च २०२५ रोजी ग्रामपंचायत चाफेरी येथे रस्त्याच्या कामाबाबत ग्रा.पं. चाफेरी, कासारी, सांडेलावगण व ग्रामस्थ यांची बैठक घेण्यात आली. यात या कार्यालयाचे अधिकारी व ग्रामपंचायत चाफेरी, कासारी सरपंच तसेच ग्रामस्थ यांनी प्रत्यक्ष साईटवर पाहाणी केली असता ग्रामपंचायत चाफेरी हद्दीतील रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक लागणारी जागा उपलब्ध करून देण्यास ग्रामस्थांनी संमती दाखविली. तसेच ग्रामपंचायत कासारी जागेमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी जागा लागत असल्यास काही ठिकाणी जिथे दगडाचे जुने बांध आहेत तिथे चाऱ्याचे बांध घालून देण्यात यावेत, अशी मागणी केली; परंतु ज्या ठिकाणी जुने बांध असतील तिथे तोच बांध हटवून बांधून देण्याचे सांगण्यात आले.
सद्यस्थितीत या रस्त्याच्या कामावर १० एप्रिलपासून मोऱ्यांचे पाईप टाकण्यास सुरुवात केलेली आहे व खडीकरणासाठी लागणारी खडी साईटवर गोळा करण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आलेल्या आहेत. तरी आपण दि. १५ एप्रिल रोजी करत असलेले आंदोलन स्थगित करून या कार्यालयास सहकार्य करावे ही विनंती, असे या पत्रात नमूद केले आहे.