
७५ टक्के लाभार्थी नमो किसान योजनेच्या लाभापासून वंचित
चिखलगावचे माजी सरपंच तुकाराम कुडकर यांचे सरकारला निवेदन सादर
राजापूर : केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या राज्यातील एकूण लाभार्थ्यांपैकी सुमारे ७५ टक्के लाभार्थी नमो किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. या सर्व शेतकर्यांना पीएम किसान योजनेप्रमाणे नमो किसान योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी तालुक्यातील चिखलगावचे माजी सरपंच तुकाराम कुडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सातत्याने विविध कारणांमुळे राहणारी प्रतिकूल स्थिती आणि पिकाला अपेक्षेप्रमाणे न मिळणारा हमीभाव यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. अशा स्थितीमध्ये केंद्र शासनाची पीएम किसान योजना आणि राज्य शासनाची नमो किसान योजनांची शेतकर्यांना साथ मिळत आहे; मात्र, केंद्र शासन आणि राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचे अद्यापही अनेक लाभार्थी वंचित असल्याकडे चिखलगावचे माजी सरपंच श्री. कुडकर यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकर्यांसाठी पीएम किसान योजना सुरू केली. त्याचा लाभ देशभरातील सर्व शेतकर्यांना होत असून आपत्काळामध्ये हे अनुदान शेतकर्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत. याच धर्तीवर राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो किसान योजना जाहीर केली आहे. नमो किसान योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करताना पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांमधून निवड केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. यानुसार पीएम किसान योजनेच्या राज्यातील सर्व लाभार्थ्यांना नमो किसान योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ २५ टक्के शेतकर्यांना नमो किसान योजनेचा लाभ मिळत असल्याचे श्री. कुडकर यांनी पत्राद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. पीएम किसान योजनेप्रमाणे राज्यातील सर्व शेतकर्यांना नमो किसान योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.
“ महाराष्ट्राची १३ कोटी जनता असून त्यामध्ये केवळ ९१ लाखच शेतकरी आहेत का ? याची पडताळणी होणे गरजेचे आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांमधून नमो किसान योजनेच्या लाभार्थ्यांची निवड झाल्याचे प्रथमदर्शनी चित्र दिसच आहे. त्यामुळे पीएमकिसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना नमो किसान योजनेचा लाभ मिळणे गरजेचे असताना अनेक शेतकरी नमो किसान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. याचा सखोल अभ्यास होवून पीएम किसान योजनेप्रमाणे नमो किसान योजनेचाही सर्व शेतकर्यांना लाभ मिळणे गरजेचे आहे. तशा मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली असून न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. ”
- तुकाराम कुडकर, माजी सरपंच चिखलगाव




