बारावीचा निकाल आज जाहीर होणार; विद्यार्थी व पालकांची प्रतिक्षा संपली.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने बारावीच्या परीक्षेच्या निकाल. आज मंगळवारी २१ मे रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती.मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार आज दुपारी जाहीर करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर आज दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवार, दिनांक २२/०५/२०२४ ते बुधवार, दिनांक ०५/०६/२०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/ UPI/ Net Banking याद्वारे भरता येईल.फेब्रुवारी-मार्च २०२४ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२४ व फेब्रुवारी-मार्च २०२५) श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील. जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक २७/०५/२०२४ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button