धनादेश न वटल्याने सावर्डे येथील कर्जदाराला दंडासह एक महिना साधी कारावासाची शिक्षा
कर्जफेडीपोटी दिलेला धनादेश न वट्ल्याने सावर्डे येथील गुरूकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे कर्जदार महेंद्र काशिराम कुंभार याला येथील न्यायालयाने ५१ हजार ५८० रुपये दंड ठोठावून एक महिना साधी कारावासाची शिक्षा सुनावली आहे.चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील गुरूकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून महेंद्र कुंभार याने १ लाखाचे कर्ज घेतले होते. कर्जफेडीपोटी त्याने पतसंस्थेच्या नावाने ३१ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. तो धनादेश न वटल्याने त्याच्याविरोधात पतसंस्थेने न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या १३८ कलमांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला. या फौजदारी गुन्ह्याच्या कामी महेंद्र कुंभार याला शिक्षा करणेत आलेली आहे. चिपळूणचे मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. आर. काळे यांनी त्याला ५१ हजार ५८० रुपये दंड ठोठावून त्यापैकी ५१ हजार ५८० रूपये नुकसान भरपाई म्हणून गुरूकृपा पतसंस्थेला देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच एक महिना साधी कारावासाची शिक्षा सुनावणेत आलेली आहे. पतसंस्थेमार्फत ऍड. एस. ए. बुरटे, ऍड. डी. आर. रसाळ यांनी काम पाहिले. www.konkantoday.com