रेशन दुकानावर आता डोळे स्कॅन होणार, मग मिळणार धान्य
रत्नागिरी : रेशनदुकानावर या पूर्वीच्या पॉस मशीनमुळे अनेक अडचणी येत होत्या. अनेकवेळा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे रेशन दुकानावर धान्यासाठी ग्राहकांना ताटकळत उभे राहावे लागत होते. यातून सुटका मिळण्यासाठी रत्नागिरीतील रेशनदुकानदारांना आता नवीन फोर जी ई-पॉस मशीन प्राप्त झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण साडेनऊशे ई-पॉस मशीन प्राप्त झाले असून या मशीनद्वारे धान्य पुरवठा सुरु आहे. पूर्वी धान्य वितरण करताना अंगठा स्कॅन केला जायचा. आता धान्य घेताना शिधापत्रिकाधारकाचे डोळेही स्कॅन होणार आहेत. जुन्या ई-पॉस मशीनच्या कटकटीतून रेशनदुकानदारांची सुटका झाली आहे. या नवीन फोर जी ई-पॉस मशीनमध्ये दोन सीमकार्ड राहणार आहेत. जीओ आणि एअरटेल या कंपन्यांची सीमकार्ड या नवीन ई-पॉस मशीनमध्ये वापरण्यात येणार आहेत. ज्या भागामध्ये जीओ किंवा एअरटेल या सीमकार्डना नेटवर्क मिळणार नाही, त्या ठिकाणी नेटवर्क मिळणाऱ्या दुसऱ्या कंपनीची सीमकार्ड टाकण्याची मुभा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नवीन ई-पॉस मशीनला नेटवर्क न मिळणे किंवा सर्व्हर डाऊन होण्याचे प्रश्न सुटणार आहेत. हे मशीन मोबाईलसारखे काम करणार आहे. एखाद्या सर्व्हरमध्ये अडचणी आल्यास तात्काळ ते अपडेट करता येणार आहे. सुरुवातीला चाचणीकरीता या फोर जीच्या दोन नवीन ई-पॉस मशीन रत्नागिरीला प्राप्त झाल्या होत्या. त्याची चाचणी यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये साडेनऊशे नवीन ई-पॉस मशीन आल्या आहेत. सर्व रेशनदुकानात या मशीनचे वाटप करण्यात आले आहे. या नवीन मशीन वापरण्याचे तंत्र रेशनदुकानदारांना अवगत व्हावे याकरीता एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. पूर्वीच्या ई-पॉस मशीनवर अंगठा स्कॅन करून धान्य वितरीत केले जायचे. आता नवीन ई-पॉस मशीनमध्ये डोळेही स्कॅन केले जाणार आहेत. प्रत्येक रेशनदुकानदारांना किमान दहा व्यवहार करताना शिधापत्रिकाधारकांचे डोळे स्कॅन करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी डोळे स्कॅन करताना अडचणी येत आहेत. डोळे स्कॅन करताना अडचणी आल्यास अंगठा स्कॅन करून धान्य मिळणार आहे. या नवीन मशीनमुळे रेशनदुकानांमध्ये आता झटपट धान्य मिळत आहे. त्यामुळे रेशनदुकानावरची रांग आता कमी झाली आहे.*आता इंटरनेटचा खर्च दुकानदारांवर नाही*पुर्वीच्या ई-पॉस मशीनला इंटरनेटचा खर्च दुकानदारांना करायला लागत होता. इंटरनेटचा खर्च करूनही नेटवर्क मिळत नसल्यामुळे दुकानदारांच्या तक्रारी येत असत. या तक्रारींना आता पूर्णविराम मिळणार आहे. नवीन फोर जी ई-पॉस मशीनच्या इंटरनेटचा खर्च ओवॅसीस कंपनी करणार आहे. या संपूर्ण मशीनची जबाबदारी ओवॅसीस कंपनीकडे देण्यात आली आहे. त्यामुळे आता दुकानदारांना इंटरनेटचा खर्च करावा लागणार नाही.www.konkantoday.com