
माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहण.
दापोली तालुक्यातील करजगाव चिपळुणकरवाडी येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी, २२ जून रोजी सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सेवानिवृत्त ऑर्डिनरी कॅप्टन सुदेश केशव चिपळुणकर (वय ५७) यांच्या फिर्यादीनुसार, प्रसाद चंद्रकांत धयाळकर आणि तीन महिला आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रसाद धयाळकर याच्या विहिरीच्या बांधकामात सुरुंग लावण्यासाठी फिर्यादी सुदेश चिपळुणकर यांनी सुमारे एक वर्षापूर्वी विरोध दर्शवला होता.
याच रागातून आरोपी प्रसाद धयाळकर आणि त्याच्यासोबत असलेल्या तीन महिला सुदेश चिपळुणकर यांच्या करजगावातील राहत्या घरात जबरदस्तीने घुसल्या. त्यांनी फिर्यादी सुदेश चिपळुणकर, त्यांची आई आणि पत्नीला हाताने मारहाण केली. एवढेच नाही तर त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या घटनेनंतर सुदेश चिपळुणकर यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे