
राज्यात रत्नागिरी प्रादेशिक मनोरूग्णालय रूग्णांचे पुनर्वसन करण्यात अग्रेसर
मानसिक आजारातून बाहेर पडून आता अनेक रूग्ण सर्वसामान्य नागरिकांचे आयुष्य जगत आहेत. आता रत्नागिरी विभागातील मनोरूग्णांचे आयुष्यही सुखकर होवू लागले आहे. रत्नागिरी विभागीय मनोरूग्णालयातील २० रूग्णांना आता स्वगृही पाठवण्यात आले आहे. तर गेल्या वर्षभरात रत्नागिरीतील ५१ रूग्णांचे कर्जत पुनर्वसन केंद्रात तर १९ महिलांचे बॅनियन केंद्रात पुनर्वसन करण्यात आले आहे. राज्यात रत्नागिरी प्रादेशिक मनोरूग्णालय पुनर्वसन करण्यात अग्रेसर ठरले आहे.
मानसिक आजार हा इतर सर्वसामान्य आजारांप्रमाणे एक आजार असल्याबाबतची सामाजिक जनजागृती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आता मानसिक रूग्णांकडे पाहण्याची दृष्टी हळुहळू बदलत आहे. आता या मानसिक रूग्णांसाठी नवीन कायदाही केंद्र सरकारकडून लागू करण्यात आला आहे. याचाच परिणाम म्हणून आता विविध शासकीय रूग्णालयात असलेल्या मानसिक रूग्णांची पाहणी करण्यात येत असून बरेच वर्ष रूग्णालयात खितपत पडलेल्या रूग्णांना आता मानसिक आजारांतून पूर्ण बरे झाल्यामुळे या रूग्णांना स्वगृही पाठवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
www.konkantoday.com