लहान मोठ्या पशुधनाच्या कानात बिल्ला आता अनिवार्य
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालक बांधव यांच्याकडे असलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या पशुधनास कानात बिल्ला असणे शासनाने बंधनकारक केले आहे. कानातील बिल्ल्याशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा दिल्या जाणार नाहीत. येत्या १ जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी किरण नरोटे यांनी दिली.केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन (एनडीएमएल) अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. पशुधनाची सर्वंकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी तसेच एखाद्या भागात उदभवणारे आजार विचारात घेवून उपाययोजना करून त्या योगे पशू व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करून त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वंकष नोंदी घेण्यात येत आहेत. त्यामध्ये जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे.www.konkantoday.com