कंत्राटी सेवेत काम करणाऱ्या आशा, संगणक परिचालक, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन रखडले; आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी : जिल्ह्यातील कंत्राटी सेवेत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, संगणक परिचालक यांचे वेतन रखडले असून, त्यांच्यामध्ये शासनाविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत हा विषय दुर्लक्षित असून, मोठ्या आर्थिक संकटांना या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.जिल्ह्यातील संगणक परिचालकांचे नोव्हेंबरच्या मानधनात कपात तर डिसेंबरचे मानधन देण्यात आलेले नाही. जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यातील मानधनाचाही अजून पत्ता नाही. परिचालकांना केवळ मासिक ६ हजार रुपये मानधन आहे. त्यातच अशा पद्धतीने कपात होणे व महिनोमहिने मानधन थकवणे असे प्रकार शासनाने नेमलेल्या कंपनीकडून सुरु आहेत. संगणक परिचालकांवर शासन व कंपनीकडून वारंवार वेगवेगळ्या प्रकारे होणारा अन्याय सुरूच आहे. कर्मचारी दर्जा व किमान वेतन आणि मासिक २० हजार रुपये मानधन मिळणे या प्रमुख मागण्या आहेत. यापैकी एप्रिलपासून मानधन वाढ करण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्रालयाकडून देण्यात आले आहे; मात्र अद्याप त्याचे परिपत्रक काढलेले नसल्याचे संगणक परिचालक संघटनेचे म्हणणे आहे.जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्चपासून वेतनच मिळालेले नाही. सातत्याने आरोग्य विभागाला याची विचारणा त्यांच्याकडून केली जात आहे. मात्र, शासनाकडूनच अनुदान आलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी थोडेफार अनुदान आले आहे. मात्र बिले भागवण्यासाठीच खर्ची होत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची आर्थिकदृष्ट्या मोठी दमछाक होत आहे. जिल्ह्यातील स्वयंसेविकांना नोव्हेंबर २०२३ पासून मानधनवाढीची प्रतीक्षाच आहे. १८ ऑक्टोबर २०२३ पासून महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी मार्च २०२४ पर्यंत बेमुदत संप केल्यानंतर १३ मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व ६९ हजार आशा महिलांना मानधन वाढ देण्याचा निर्णय केला आहे. यानुसार अद्यापही ७ महिने होत आले तरीही मानधन मिळालेले नाही, मानधन वाढीची रक्कम महाराष्ट्रातील प्रत्येक आशा महिलांना त्वरित मिळावी, अन्यथा आशा महिलांना तातडीने तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी यांनी आशा दिला आहे.*आशा कर्मचाऱ्यांवर सक्तीची कामे :*आशांना मागील ६ महिन्यांपासून पगारवाढ नाही. त्यातच आरोग्य खात्यातील शासकीय अधिकाऱ्यांकडून आशांवर सक्तीने कामे वाढवली जात आहेत. नेमून दिलेल्या कामाशिवाय इतर कामे सांगत आहेत. अशाप्रकारे अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. शासनाला पाठवलेले निवेदन सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे काम सध्या सुरू आहे.*रुग्णवाहिका चालकांचे वेतनही रखडले :*रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रुग्णवाहिका चालकांचे मार्च ते एप्रिल असे गेले २ महिने मानधन रखडले आहे. वेतनाबाबत विचारणा केल्यावर ठेकेदाराकडून उडवाउडवी केली जात असल्याने रात्रंदिवस रुग्णवाहिकेवर सेवा बजावणाऱ्या चालकांना यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.