
अनधिकृत जाहिरात फलक २४ तासात काढा, चिपळूण नगरपालिकेच्या सूचना
चिपळूण शहरातील मुख्य भागांसह इमारतींवर अनधिकृत उभारलेल्या मोठमोठ्या जाहिराती फलकांच्या १९ मालकांना नगर परिषदेने बुधवारी नोटीस धाडल्या आहेत. २४ तासात फलक काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असून न काढल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे मागणीसाठी नागरिक प्रशासनाला १६ मे रोजी निवेदन देणार आहेत.गेल्या काही वर्षापासून शहरातील चिंचनाका, मार्कंडी, काविळतळी, भोगाळे, जुना बसस्थानक, बाजारपूल, बहाद्दूरशेखनाका, पॉवर हाऊस आदी ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलकांचा बाजार दिसून येत आहे. कर चुकविण्यासाठी नगर परिषदेची परवानगी न घेता हे फलक लावण्यात आल्याने व त्यांच्यावर इतक्या वर्षात ठोस कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या अनधिकृत फलकांनी नगर परिषदेच्या इमारतीही भरल्या आहेत. असे असताना आता मुंबईतील दुर्घटनेनंतर नगर परिषदेच्या बांधकाम विभागाला जाग आली आहे.दापोलीतील बेकायदा फलकांबाबत लवकरच कारवाईमुंबई-घाटकोपर येथे घडलेल्या फलक दुर्घटनेपश्चात दापोली नगरपंचायतीने खबरदारी म्हणून दापोलीत उभारण्यात आलेल्या मोठ्या फलक मालकांना खबरदारीच्या सूचना घेण्याबाबत नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बेकायदा फलक हटवण्याबाबत लवकरच कारवाई करणार असल्याचे नगर पंचायत प्रशासनाने सांगितले आहे.दापोलीतही बसस्थानकाच्या आवारात गेल्या वर्षी एक होर्डींग कोसळले होते. मात्र सुदैवाने या जीवितहानी झाली नव्हती. तरीही नगरपंचायतीने शहरात उभारण्यात आलेले बेकायदा फलक हटवण्याचा निर्णय घेतला आहे. www.konkantoday.com