
राज्य नाटय स्पर्धेतील तृतीय क्रमांकप्राप्त नाटक खल्वायनचे संगीत अमृतवेल १९ मे रोजी स्वा. सावरकर नाट्यगृहात रंगणार
रत्नागिरी : कोल्हापूर येथे अलीकडे झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत ८ वैयक्तीक पारितोषिकांसहीत तृतीय क्रमांक मिळालेले खल्वायन संस्थेचे नवीन कोरे नाटक संगीत अमृतवेल हे नाट्य रसिकांना पाहण्याचा योग जुळून आला आहे. हे नाटक रविवारी दि. १९ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता रत्नागिरीच्या स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात रंगणार आहे.संगीत अमृतवेल हे खल्वायन संस्थेचे आठवे नवीन संगीत नाटक आहे. या आधी संगीत घन अमृताचा, शांतिब्रह्म, ताजमहाल, या नव्या कोऱ्या नाटकांनी इतिहास घडवत राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाबरोबरच मुंबई, पुणे, मध्य प्रदेश, नवी दिल्ली, गोवा, कारवार इत्यादी ठिकाणच्या नाट्यरसिकांची मने जिंकली होती. संगीत अमृतवेल हे रत्नागिरीचे प्रसिद्ध कादंबरीकार व नाट्यलेखक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेले सातवे नवीन संगीत नाटक आहे. नामवंत दिग्दर्शक मनोहर जोशी यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकाने इतिहास घडवत ८ वैयक्तिक पारितोषिकांसहित तृतीय क्रमांक प्राप्त केला.सुमारे सातशे वर्षांपूर्वीपासून सामाजिक विषमतेच्या गर्तेत सापडलेल्या समाजाला सन्मार्गावर आणण्यासाठी ज्या ज्या संतांनी आपले आयुष्य वेचले, त्यासाठी अनंत यातना भोगल्या, त्या महान विभूतींमध्ये संत चोखामेळा यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागते. या संत चोखामेळा यांच्या जीवन चरित्रावरील हे नवीन संगीत नाटक लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, अभिनय, गायन, संगीत दिग्दर्शन, प्रकाश योजना, साथसंगत या सर्वच बाबतीत या नाटकाने स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवून घसघशीत ८ पारितोषिके मिळवीत, तृतीय क्रमांक मिळविला आहे. सावनी शेवडे, अनामय बापट या ताज्या दमाच्या युवा कलाकारांनी गायनात आपली चमक दाखविली आहे. त्याला राम तांबेंसारख्या अनुभवी ज्येष्ठ कलाकाराची जोड मिळाली आहे. चेतन जोशी या हौशी कलाकारानेही गायनात रंग भरला. प्रदीप तेंडुलकर, मनोहर जोशी, विजय जोशी आणि अनिकेत आपटे या कलाकारांनी आपल्या अभिनयातून नाटक उंचीवर नेऊन ठेवले. उर्वरित कलाकारांनीही त्यांना चांगली साथ दिली.हेरंब जोगळेकर यांच्यासारखा कसबी व मुरलेला कलाकार तबल्याची साथ, ऑर्गनची दमदार साथ युवा कलाकार स्वानंद नेने करीत आहे. वाडा जूनचा युवा कलाकार देवाशिष बापट प्रथमच पखवाजची उठावदार साथसंगत करीत आहे. त्याला दापोलीचा युवा तबलावादक प्रथमेश फाटक तालवाद्याची तितकीच महत्त्वाची साथ करीत आहे. सौ. निता जोशी, कौस्तुभ सरपोतदार, बालकलाकार राजस सिनकर यांनीही आपापल्या परीने अभिनयात चमक दाखविली आहे. या नाटकाची रंगभूषा रामदास मोरे यांनी केली असून निखिल जोशी, मंजिरी जोशी, ओंकार जोशी, काव्या जोशी, यांच्याही भूमिका या नाटकात असून मोहन धांगडे, किशोर नेवरेकर, सुधाकर घाणेकर, संजय लोगडे, सौरभ लोगडे यांनीही या नाटकात भुमिकेबरोबरच बॅक स्टेजची जबाबदारी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन राम तांबे, प्रकाश योजना मंगेश लाकडे, पार्श्वसंगीत प्राजक्ता जोशी, वेशभूषा श्रीनिवास जोशी यांची आहे.