
आ. साळवी यांनी घेतला राजापूर तालुक्याच्या ‘आपत्ती’चा आढावा
राजापूर : पावसाळ्यात उद्भवणार्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागांनी सतर्क राहावे. आपदग्रस्त ग्रामस्थ, शेतकरी यांच्या मालमत्तेचे तसेच शेतीच्या होणार्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावेत, अशा सूचना आ. राजन साळवी यांनी दिल्या.
प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती घेण्यासाठी आ. साळवी यांच्या उपस्थितीत राजापूर प्रांताधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर, गटविकास अधिकारी सुहास पंडित आदी उपस्थित होते. यावेळी आ. साळवी यांनी सर्व प्रशासकीय विभागांचा आढावा घेतला. भुस्खलनाचा धोका असलेल्या धोपेश्वर खंडेवाडी, बौद्धवाडी येथील कुटुंबांना स्थलांतरित करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या असून, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे यावेळी तहसीलदार जाधव यांनी सांगितले. तसेच तहसील कार्यालयात चोवीस तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पावसळ्यात दरडी कोसळल्यास, झाडे मोडून रस्त्यावर पडल्यास तात्काळ मदत कार्यासाठी 11 जेसीबी तैनात ठेवण्यात आल्याचे बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
गतवर्षी पावसाळ्यात नादुरूस्त झालेल्या ओणी – अणुस्कुरा रस्त्यातील अणुस्कुरा घाटाच्या पायथ्यापर्यंतचे खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी दिली. पावसाची उघडीप मिळताच उर्वरित खड्डे बुजविण्याच्या सूचना आ. साळवी यांनी यावेळी दिल्या. तसेच सौंदळ येथील रस्त्याची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहितीही बांधकाम विभागाने दिली. अर्जुना प्रकल्पाचा कालवा फुटल्याने सुमारे अडीच हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून, त्याचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात
आली.
कोदवली आगरवाडी येथील ट्रान्स्फार्मर जळाल्याने पाणी योजना बंद पडली असून, तो तत्काळ बदलण्याच्या सूचना आ.साळवी यांनी केली. राजापूर शहरातील पूरस्थितीत बचाव कार्यासाठी दोन फायबर बोटी तैनात करण्यात आल्याची माहिती न.प.प्रशासनाने दिली. पावसाळ्यात उद्भवणार्या साथीच्या रोगांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागही सतर्क असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले.




