गोळप येथील खुनाच्या घटनेमुळे गुरख्यांच्या ओळखपत्रासाठी बागमालकांकडे पोलिसांकडून चौकशी
रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे दोन गुरख्यांच्या खूनानंतर आता गुरख्यांचे फोटो व त्यांच्या ओळखीसंबंधीच्या कागदपत्रांबाबत आंबा बागमालकाकडे पोलिसांकडून तगादा लावण्यात येत आहे. आंबा हंगाम संपत आला असताना पोलिसांकडून आता होणारी ही कार्यवाही म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आंबा काढणीच्यावेळी पोलिसांकडून होणार्या या कागदपत्रांच्या मागणीमुळे बागायतदार पुरते हैराण झाले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात आंबा बागेच्या राखणीसाठी मोठ्या प्रमाणावर गुरखे येत असतात. स्थानिक लोकांची या कामासाठी असलेली उदासिनता व पैशाच्या दृष्टीने सोयीचे ठरत असल्याने आंबा बागायतदार देखील गुरख्यांना पसंती देतात मात्र हे गुरखे जिल्ह्याच्या ठिकठिकाणी येवून गुन्हेगारी कृत्य देखील करताना आढळून आले आहे. नुकतेच गोळप मुस्लिमवाडी येथील आंबा बागेत दोन सख्खे भाऊ असलेल्या गुरख्यांचा खून झाला होता. या प्रकरणानंतर आंबा बागेत काम करणार्या गुरख्यांचे फोटो व ओळखपत्रे बाग मालकांकडे नसल्याचा प्रकार समोर आला होता.जिल्ह्यात ग्रामीण भागात वास्तव करणार्या या गुरख्यांकडून गैरप्रकार झाल्यास त्यांना शोधायचे कुठे असा प्रश्न पोलिसांपुढे उपस्थित झाला आहे. त्यामुळे पोलिसांकडून आंबा बागायतदारांकडे त्यांच्या बागेत काम करणार्या गुरख्यांची माहिती पोलिसांकडून मागविण्यात आली आहे. सध्या सर्वत्र आंबा तोडणीचे काम जोरात सुरू आहे. तसेच वर्षभराची मेहनत असलेल्या आंबा विक्रीसाठी बागायतदार प्रयत्न करत आहेत. अशातच पोलिसांकडून माहिती मागविण्यात आल्याचे बाग मालक पुरते हैराण झाले. www.konkantoday.com