
मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस
संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातल्यानंतर अवकाळी पावसाचा मुंबईत प्रवेश झाला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह दुपारच्या वेळेत पाऊस पडला. या वादळामुळे मुंबईत दोन ठिकाणी भीषण दुर्घटना झाल्या आहेत.घाटकोपर आणि वडाळ्यामध्ये दोन अपघात घडले आहेत, या दोन्ही अपघातांचे अंगावर काटा आणणारे व्हिडिओ समोर आले आहेत.वडाळा परिसरामध्ये श्रीजी टॉवरच्या शेजारील कार पार्किंगसाठी बनवण्यात येत असलेल्या ठिकाणी अपघात झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे इथे बांधकामासाठी लावण्यात आलेला जिना पूर्णपणे पडला आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.दुसरीकडे घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर एक मोठं होर्डिंग कोसळलं आहे. या होर्डिंगखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसंच पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या गाड्यांचंही नुकसान झालं आहे.आज दुपारनंतर मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर आणि आसपासच्या भागामध्ये वादळी वारा आणि पावसाला सुरूवात झाली. बदलापूरमध्ये तर गाराही पडल्या आहेत. या पावसाचा परिणाम मध्य रेल्वेवरही झाला आहे. अंबरनाथ स्थानकाजवळ झाडाची फांदी ओव्हरहेड वायरवर पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.मुंबई मेट्रो 1 सेवा ठप्प झाली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या ठिकाणची झाडे उन्मळून पडली आहेत. मुंबई एअरपोर्टचा रनवेही यामुळे बंद करण्यात आला आहे. दृश्यमानता कमी झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाहनांचा वेगही मंदावला आहे.www.konkantoday.com