कुरिअर कंपनीने पर्सचे पार्सल जर्मनीत पोहोचवले नाही, कुरिअर कंपनीला ग्राहक मंचाकडून नुकसान भरपाई देण्याचे आदेश
हजारो रुपये किंमतीच्या पर्स भरलेला खोका जर्मनीतील अपेक्षित पत्त्यावर पोहोचला नाही आणि त्यासंदर्भात कुरिअर कंपनीने योग्य वर्तन केले नाही असा ठपका ठेवून रत्नागिरी येथील ग्राहक आयोगाने कंपनीला चांगलाच फटका दिला आहे. ग्राहकाला पर्सच्या पार्सलची रक्कम परत द्यावी शिवाय मानसिक त्रासापोटी व खर्चापोटी अशी १५ हजार रुपयांची रक्कम अदा करावी असे आदेश ग्राहक आयोगाने दिले.रत्नागिरी येथील आरती ऋषिकेश पटवर्धन (रा. पटवर्धनवाडी, उद्यमनगर, रत्नागिरी) या स्वयंरोजगारातून पैसे मिळवतात. स्वतः व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता पर्स तयार करून विक्री करण्याचे काम करतात. त्यांनी मागणीप्रमाणे पार्सल भरून ग्राहकांना पाठवून देण्याचे ठरविले. जर्मनीतील ग्राहकांकडून मागणी आल्यानंतर त्याला माल पाठवण्याचा निर्णय घेतला. पटवर्धन यांनी ५५ पर्सचा एक बॉक्स आणि छोट्या १०१ पर्सचा दुसरा बॉक्स असे दोन बॉक्स तयार केले. मोठ्या बॉक्सचे वजन १५.६९० किलो तर लहान बॉक्सचे वजन ६.८०० किलो एवढे हाते. दोन्ही बॉक्सची किंमत ४३,०३० रुपये एवढी होते. महानगर कुरिअर ऍण्ड कार्गो या कंपनीने पटवर्धन यांच्याकडून पार्सले स्वीकारली.ही पार्सले जर्मनी येथे अपेक्षित पत्त्यावर पाठवून देण्याची हमी कुरिअर कंपनीने दिली. जर्मनीतील ग्राहकाला मोठा बॉक्स पोहोचला, परंतु छोटा बॉक्स पोहोचला नाही. कुरिअर कंपनीकडे वारंवार चौकशी केली असता बॉक्स मिळून येत नाही. तो मिळाला की पोहोच करू अशी खात्री दिली. प्रत्यक्षात सामान पोहोचवू शकले नाहीत. गहाळ झालेल्या बॉक्समधील मालाची किंमत २८ हजार ७४० रुपये होती. पार्सल गहाळ झाल्याने पटवर्धन यांनी कुरिअर कंपनीकडे विचारणा केली. त्यावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली म्हणून ग्राहक मंचाकडे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांची तक्रार ग्राहक आयोगाचे अध्यक्ष अरूण गायकवाड सदस्य स्वप्नील मेंढे, सदस्या अमृता भोसले यांच्यासमोर सुनावणीस आली. सुनावणीच्या वेळी कुरिअर कंपनीला नोटीस मिळाली. तरी कोणी उपस्थित झाले नाही. अखेरीस मंचाने एकतर्फी सुनावणी घेवून निर्णय दिला. आपल्या निर्णयात ग्राहक आयोगाने नमूद केले की, गहाळ झालेल्या बॉक्समधील सामानाच्या भरपाईपोटी ३७ हजार ६५० रुपये एवढी रक्कम कुरिअर कंपनीने ग्राहकाला अदा करावी. मानसिक त्रासापोटी १० हजार व तक्रार अर्ज खर्चापोटी ५ हजार रुपये रक्कम कुरिअर कंपनीने ग्राहकाला अदा करण्याचे आदेश दिले. www.konkantoday.com