
रूंदीकरणाच्या अर्धवट कामामुळे भोर घाटात चिखलाचे साम्राज्य.
महाड-भोर मार्गाचे रूंदीकरणाचे काम सुरू असताना अचानकपणे पडलेल्या अवकाळी पावसामुळे भोर घाटातील निगुडघर ते भोर दरम्यान मोठ्या प्रमाणावर चिखल साचला आहे. परिणामी या मार्गावरून ये-जा करणार्या वाहनचालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.सध्या महामार्गावर एसटी बस, मालवाहू ट्रक व इतर खाजगी वाहने अक्षरशः कसरत करत मार्ग काढत आहेत. मागील दोन दिवसांपासून अनेक लहान वाहने चिखलात अडकून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे वाहतूकही काही काळ ठप्प होण्याच्या घटना समोर आल्या आहेत.
महाड-भोर मार्गावर चालू असलेल्या रूंदीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्ता खणला गेला आहे. त्या ठिकाणी योग्य प्रकारे मुरूम अथवा सिमेंटींग न केल्यामुळे थोड्याशा पावसातच चिखल तयार होवून रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत महामार्ग ठेकेदारांच्या यंक्षणांकडून चिखल हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र अजूनही रस्त्याची अवस्था सुधारलेली नाही. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्या नागरिकांनी काळजी घेवून, शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा उपयोग करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.www.konkantoday.com