
जिल्हास्तरीय ढोल-ताशा वादन स्पर्धेत राजापूरचे पथक प्रथम
लांजा : कुवे येथील जिल्हास्तरीय ढोल-ताशा वादन स्पर्धेत पवार मंडळ दिवटेवाडी, राजापूर पथकाने प्रथम क्रमांक पटकावला. श्री रासाई उत्कर्ष मंडळ, महिला मंडळ, मुंबई मंडळ, कुवे मावळतवाडी ता. लांजा यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रासाई मंदिर येथे श्री सत्यनारायण पूजेनिमित्त स्पर्धा उत्साहात झाली. उत्सवात धार्मिक विधी, मुलांसाठी विविध स्पर्धा, नमन आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. ढोल ताशा वादन स्पर्धेत गांगोदेव ढोल पथक खरवते मधलीवाडी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला तर उत्तेजनार्थ प्रथम धावजी ढोल पथक, हरळ व उत्तेजनार्थ द्वितीय श्री देव लक्ष्मीकांत, इंदवटी यांची निवड करण्यात आली. रोख रक्कम व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील आकर्षक वेशभूषेसाठी श्री जांगलदेव खरवते मधलीवाडी पथकाची निवड करून गौरवण्यात आले. श्री सत्येश्वर वनगुळे ढोल पथकाला उत्कृष्ट सनईचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री रासाई उत्कर्ष मंडळ, महिला मंडळ, मुंबई मंडळ, कुवे मावळतवाडी यांनी मेहनत घेतली.