
दहावी-बारावी निकाल तारखा; सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका!!
महाराष्ट्र : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या मुख्य परीक्षेच्या निकालांच्या वेगवेगळ्या तारखा सोशल मीडियावरून फिरत आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असून मुंबई, पुण्यासह राज्यातील नऊ विभागीय मंडळांत निकालासंदर्भात वारंवार विचारणा केली जात आहे. यावर खुलासे करताना मंडळातील अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे.दहावीचा निकाल हा १० मे रोजी, तर काही ठिकाणी दहावी-बारावीचा निकाल २० ते ३० मे दरम्यान जाहीर केला जाणार असल्याची माहिती सोशल मीडिया आणि संकेतस्थळावर दिली जात आहे. याबाबत पालक आणि विद्यार्थी संबंधित शाळा, विभागीय मंडळांकडे चौकशी करत असून त्याचा निकाल आणि त्यासंदर्भातील कामकाजावर परिणाम होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा अखेरच्या आठवड्यात लावण्याचे मंडळाचे प्रयत्न आहेत. मात्र, त्याच्या कोणत्याही तारखा अद्याप मंडळाने जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळे या निकालाच्या तारखांसंदर्भात सोशल मीडियावर दिल्या जाणाऱ्या माहितीवर पालक, विद्यार्थी आणि शाळांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले आहे. *संकेतस्थळावरील माहिती अधिकृत*राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दहावी-बारावीच्या निकालासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली जाते. यंदाच्या निकालासंदर्भातील तारखाही तेथे जाहीर केल्या जातील. या संकेतस्थळावर जाहीर केलेली निकालाची तारीख अधिकृत असेल, असे राज्य शिक्षण मंडळाचे शरद गोसावी यांनी सांगितले.www.konkantoday.com