
संगमेश्वर – गोळवली येथे खवले मांजराचे खवले जप्त; एकास अटक
रत्नागिरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून संगमेश्वर गोळवली येथे खवले मांजराचे खवले जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मिळालेल्या माहितीनुसार दि. 7 जुलै रोजी सापळा रचण्यात आला. गोळवली येथील यादववाडी स्टॉप येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व संगमेश्वर पोलीस ठाण्यातील अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक देशमुख व अंमलदार यांनी सापळा रचला. येथे एक इसम संशयास्पद स्थितीत मिळून आल्याने त्यास थांबवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ किलो ७०० ग्रॅम खवले मांजराची खवले मिळून आली. एकनाथ महादेव पंडव (वय ४९, रा. चिखली पंडववाडी, ता.
संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यास ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्याचा तपास पी. व्ही. देशमुख हे करीत आहेत. या आरोपीस 8 रोजी न्यायालयात हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पी. व्ही. देशमुख, प्रशांत शिंदे, प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, शांताराम झोरे, अरुण चाळके, नितीन डोमणे, दत्तात्रय कांबळे यांनी ही कारवाई केली. वनरक्षक आकाश कडुकर, राजाराम पाटील यांनी मदत केली आहे.




