
मुंबईहून मालवणच्या दिशेने जाणाऱ्या गणेशभक्तांच्या लक्झरी बसला मध्यरात्री कशेडी बोगद्याच्या जवळील पुलावर अचानक आग, प्रवासी सुरक्षित
गणपती उत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत आहेतमुंबईहून मालवणच्या दिशेने गणेशभक्तांना घेऊन जाणाऱ्या एका लक्झरी बसला काल मध्यरात्री 2:10 वाजता कशेडी बोगद्याच्या सुरुवातीस असणाऱ्या पुलावर अचानक आग लागली.गाडीचा टायर फुटल्याने ही आग लागली. या घटनेनंतर क्षणातच ज्वाळांनी संपूर्ण बसला वेढा घातला आणि आगीचा भडका उडाला. चालकाने प्रसंगसंवधानता राखून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या दुर्घटनेनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या दुर्घटनेत MH 02 FG 2121 क्रमांकाची खासगी आराम बस पूर्णपणे जळून खाक झाली असून प्रवाशांचे साहित्य देखील आगीत भस्मसात झाले. ही बस ओमकार मागले यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर येत असून ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती पोलीस घेत आहेत.




