
दापोलीत नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाने इच्छुकांचे मनसुबे उधळले; महिला आरक्षण जाहीर
दापोली : दापोली नगर पंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडाल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या अनेकांच्या अपेक्षांवर गुरुवारी (दि.27 रोजी) जाहीर झालेल्या महिला आरक्षण सोडतीने पाणी फिरवले. सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने आता नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीचा पहिला बहुमान शिवसेनेला की राष्ट्रवादीला? अशी चर्चा दापोली शहरात सुरू झाली आहे.
दापोली नगर पंचायत निवडणुकीत दिग्गजांनी उडी घेतली होती. यात काहींना अपयश आले तर काही विजयी झाले. या विजयानंतर विजय उसत्व देखील दणक्यात साजरा झाला. तर आगामी पडणारे नगराध्यक्ष आरक्षण हे पुरुष सर्वसाधारण पडेल, अशी अपेक्षा अनेकांना असताना महिला आरक्षणाने अनेकांचा हिरमोड झाला आहे.
दापोली नगर पंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादी अशी आघाडीची सत्ता आली आहे. यात शिवसेना 6 तर राष्ट्रवादी 8 असे संख्याबळ आहे. दोन्ही पक्षांना अडीच-अडीच वर्ष असे आघाडीच्या मागील पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले आहे. मात्र तरीही या करारात पहिला बहुमान कोणाला? अशी उत्सुकता दापोलीकरांना लागली आहे. शिवसेनेत शिवानी खानविलकर यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. ममता मोरे देखील या स्पर्धेत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीत साधना बोत्रे यांचे नाव चर्चेत आहे. यातून नगराध्यक्ष पदाची लॉटरी नेमकी कुणाला लागेल, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
www.konkantoday.com