माकडांपासून कोकण वाचवा वानर, माकड प्रश्नाबाबत आवाहन करणारा फलक चर्चेत
वानर, माकड या रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील गंभीर प्रश्नाबाबत कोणीही उमेदवार प्रचार सभांमध्ये बोलत नसल्याने जाहीरर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांनी वानर, माकडांपासून कोकण वाचवा असे भावी खासदारांना आवाहन करणारा फलक घेवून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.याबाबत काळे म्हणाले की, लोकसभा निवडणूक जाहीर प्रचाराचा रविवारी शेवटचा दिवस असल्याने दुपारी बारा वाजता जयस्तंभ येथे भावी खासदार यांना वानर माकड प्रश्नांबाबत आवाहन करणारा फलक घेवून काही वेळ उभा होतो. त्यानंतर अभ्युदय नगर परिसरात शिवसेना ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या कार्यालयाबाहेर हातात हा फलक घेवून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. तिथे खासदार विनायक राऊत साहेब यांचे स्वीय सहाय्यक तांबे यांची भेट झाली. त्यांच्याशी वानर माकड, प्रश्न, समस्या, उपाय याबाबत चर्चा केली. मागील अधिवेशनाच्यावेळी आपण राऊत यांना हा प्रश्न आणि त्याबाबत झालेल्या आंदोलनाची कागदपत्रे आणि हिमाचलचा जीआर पाठवला होता याची आठवण करून दिली.तसेच पुन्हा एकदा हा गंभीर विषय राऊत यांच्यापर्यंत पोचावा आणि त्यांनी त्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.www.konkantoday.com