
उद्धव ठाकरे म्हणाले इथून दिसणार नाही. त्यामुळे ते मागे आले होते: संजय राऊत
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती.मात्र, या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांना सहाव्या रांगेत बसवण्यात आल्याचे दृश्य समोर आले आहे. या घडामोडीनंतर भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका करत निशाणा साधायला सुरुवात केली आहे. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत म्हणाले की, मागे बसल्याची टीका करणारे लोक फालतू आहेत. समोर स्क्रीनवर काही प्रेझेंटेशन होत होते. उद्धवजींना पुढे बसवले होते. पण, त्यांचे म्हणणे पडले की स्क्रीनच्या समोर बसून पाहताना त्रास होतो किंवा नीट दिसत नाही. त्यामुळे आम्ही सर्वच पाठीमागे गेलो. हे भाजपचे आयटी सेलवाले फालतू लोक आहेत. त्यांना समजायला हवे. उद्धव ठाकरेंचे अजून पण फोटो आहेत, ते तुम्ही पाहिले नाहीत का? उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी, आदित्य ठाकरे यांना राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी त्यांचा नवीन घर संपूर्ण दाखवलं. त्या ठिकाणी प्रेझेंटेशन सुरू होते. मी स्वतः तिथे होतो. कमल हसन होते. शरद पवार देखील आमच्या सोबत बसले होते. प्रमुख नेत्यांना पुढे बसवले होते. पण, उद्धव ठाकरे म्हणाले इथून दिसणार नाही. त्यामुळे ते मागे आले होते, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरेंनी दिल्लीत महाराष्ट्राची लाज काढली, टीका केली. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, त्या म्हस्केंना सांगा, दुतोंडी गांडूळ, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडताना तुम्हाला मान-अपमान दिसले नाही का? दिल्लीत येऊन मोदी आणि शाह यांची चाटुगिरी करतात, तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का? आमचे आम्ही बघून घेऊ. अविमुक्तेश्वरानंद नावाचे शंकराचार्य आहेत. जे एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आशीर्वाद देत असतात. काही धार्मिक विधी करत असतात. शंकराचार्य म्हणून सरकारी पाहुण्यांचा दर्जा असतो. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या सरकारी पाहुणे म्हणून दर्जा महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाने काढून घेतला आहे. त्याचे उत्तर म्हस्के यांनी द्यावे, असा पलटवार त्यांनी केलाय.




