
खरे राज ठाकरे कुठचे? विनायक राऊत यांचा सवाल
कोकणात जागतिक वारसा सांगणारी दुर्मिळ अशी कातळशिल्प आहेत. त्याचे जतन करावे, अशी भूमिका अनेकांसोबतच राज ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी घेतली होती. तेच राज ठाकरे आता रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करत आहेत. त्यामुळे कातळशिल्पांचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की जाहीर सभेत रिफायनरी प्रकल्प व्हावा असा आग्रह धरणारे राज ठाकरे खरे? असा सवाल उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाने राज ठाकरेंवर टीकेचा आसूड ओढला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी शनिवारी सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. यावेळी शिवसेना ठाकरे गटावर टीका करताना राज ठाकरेंनी रिफायनरी प्रकल्पाविषयी काही उदाहरणे देत या प्रकल्पाचे एकाअर्थाने समर्थन करणारी भूमिका मांडली होती. त्यांच्या या भूमिकेला ठाकरे गटाचे नेते आणि या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांनी जोरदार उत्तर दिले आहे.खा. विनायक राऊत यांनी म्हटले आहे की, राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंविषयी द्वेष व्यक्त करत टीका केली आहे. रिफायनरीसंदर्भात त्यांचे वक्तव्य संभ्रमात टाकणारे आहे. ज्या परिसरात रिफयानरी प्रकल्प होणार आहे त्या परिसरात 14 हजार वर्षांपुर्वीची कातळशिल्पे आहेत. त्याचे संवर्धन व्हावे, अशी भूमिका राज ठाकरेंनीदेखील काही दिवसांपुर्वी मांडली होती. आज तेच राज ठाकरे रिफायनरीचे समर्थन करत आहेत. कोणते राज ठाकरे खरे? असा सवाल त्यांनी केलाwww.konkantoday.com