गोळप येथील नेपाळ्यांच्या दुहेरी हत्याकांड, गुन्ह्याची उकल होण्याची दाट शक्यता
रत्नागिरीतालुक्यातील पावस नजीकच्या गोळप येथील नेपाळ्यांच्या दुहेरी हत्याकांडाचा तपास अंतिम टप्प्यात आला असून, चौकशीसाठी बोलाविलेल्या काही तरुणांवर पोलिसांचा संशय बळावला आहे. त्यामुळे आज या गुन्ह्याची उकल होण्याची दाट शक्यता असून हत्येमागील कारण स्पष्ट होणार आहे.गोळप मुस्लिम मोहल्ला येथील मुदस्सर मुकादम यांच्या बागेत रखवालदार असलेल्या भक्त थापा, ललन थापा या दोघा सख्या भावांची धारदार शस्त्राने वार करून त्यानंतर डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. ती हत्या आंबा चोरट्यांकडून किंवा नेपाळमधील पूर्ववैमान्यातून झाल्याचा पोलिसांचा संशय होता. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही दिशेने तपास सुरू ठेवला होता. गेले दोन दिवस उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईंनकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पूर्णगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर धायकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्ह्याचा तपास सुरू होता. स्थानिक आंबा चोरटे, पंचक्रोशीतील नेपाळ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशी सुरू होती.www.konkantoday.com