संभाजीराजेंसोबत चुकीचं वागलो तर जाहीर माफी मागतो-उद्धव ठाकरे
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार शाहू महाराज छत्रपतींच्या प्रचारासाठी आले होते. या प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत यांनी केलेल्या आरोपांवर पलटवार केला आहे.राज्यसभा निवडणुकीमध्ये संभाजी राजेंना उमेदवारी देण्यावरून कशाप्रकारचा ड्राफ्ट तयार करण्यात आला होता, याबाबत बोलताना उदय सामंत यांनी काही खळबळजनक दावे केले होते, त्यावर उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या सभेत बोलले आहेत.
‘आज संभाजी राजेंबाबत कोणीतरी सांगितले. पण संभाजीराजेंसोबत चुकीचं वागलो तर जाहीर माफी मागतो. जर त्यावेळी दगाफटका केला असेल, तर आता तुम्ही का त्यांना पाडायला निघाला आहात?’ असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
काय म्हणाले होते उदय सामंत?
‘ज्यांना आता गादीचा पुळका आला आहे त्यांच्यासाठी पत्रकार परिषद घेत आहे. राज्यसभा निवडणुकीवेळी संभाजी राजेंसाठी एक ड्राफ्ट बनवला. त्या ड्राफ्टमध्ये संभाजीराजेंना उमेदवारी दिली तर ग्रामपंचायत ते लोकसभा ते सेनेचा प्रचार करतील. संभाजीराजे वंशज असले तरी शिवसेनेचं काम करतील आणि त्यांना पक्षादेश बंधनकारक असेल, त्यांनी फक्त शिवसेनेची भूमिका मांडली पाहिजे. संभाजीराजे यांनी पक्षप्रमुख हेच माझे नेते आहेत, त्यांचा आदेश मी मानणार हे प्रेस घेऊन जाहीर करावं’, असं ड्राफ्टमध्ये असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला होता.
‘संभाजी राजे यांनी यात बदल सुचवला होता, त्यात मी शिवाजी महाराजांचा वंशज असल्यामुळे शिवसेनेचे मुद्दे मांडणं शक्य होणार नाही. गडकोट, शिवाजी महाराज यांचा संदेश मी पोहोचवेन, असं त्यांनी सांगितलं. ड्राफ्ट करत असताना मला समोरून फोन येत होता आणि मी बदलत होतो. पण संभाजीराजे अवहेलना करता, असा आरोप करून निघून गेले. मला पुन्हा फोन आला आणि काहीही करून पक्ष प्रवेश करून घ्या, असा आदेश आला. एखादा तरी छत्रपती आपल्या पक्षात असावा, असं मला सांगण्यात आलं. अनिल देसाई, मिलिंद नार्वेकरी आणि मी त्यावेळी ओबेरॉय हॉटेलला गेलो. तिथे हा ड्राफ्ट बघून मलाही धक्का बसला,’ असं उदय सामंत म्हणाले आहेत.
‘हा ड्राफ्ट तीन तास लिहित होतो, कॉलेजमधून बाहेर पडल्यावर मी सगळ्यात जास्त लिहिले. मला फोन यायचा आणि तो स्पीकरवर टाकायला सांगायचे. तो ड्राफ्ट नोटरी करूनही घ्यायला सांगितलं होतं. हा ड्राफ्ट अजूनही माझ्याकडे आहे. पक्ष काढला तर उमेदवारी देणार नाही, असं सांगितलं होतं. संभाजीराजेंचा अपमान ज्यांनी केला, तेच आज कोल्हापुरात येऊन गादीचा मान आहे, असं सांगतायत’, असा आरोप उदय सामंत यांनी केला आहे.
www.konkantoday.com