लोकसभा निवडणुकीमध्ये रंगत आणायची इच्छा असती तर भाजपने किरण सामंत यांना उमेदवारी दिली असती-विनायक राऊत.
लोकसभा निवडणुकीमध्ये रंगत आणायची इच्छा असती तर भाजपने किरण सामंत यांना उमेदवारी दिली असती. आम्हाला भीती नाही; मात्र त्यांच्या उमेदवारीमुळे रंगतदार लढत झाली असती. मात्र आता आपण सहज विजयी होऊ. त्यामुळे नारायण राणे यांची गाडी पुढे ढकलण्यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंतची लोकं आली आहेत, अशा शब्दामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी पाचल-तळवडे येथील प्रचारसभेमध्ये विरोधकांचा समाचार घेतला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीची प्रचारसभा आज पाचल-तळवडे येथे झाली. या वेळी आमदार राजन साळवी, माजी आमदार गणपत कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले, पुणे उपशहर संघटक विद्या होडे आदी उपस्थित होते. राऊत म्हणाले, उद्योजक किरण सामंत यांना उमेदवारी दिल्यास कोकणामध्ये आपणाला त्रास होईल याची भीती भाजपसह भाजपच्या नेत्यांना आहे. म्हणून त्यांनी नारायण राणे यांना उमेदवारी दिली. रिफायनरीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यावर बोलताना ते म्हणाले, जमिनीची दलाली करून रिफायनरीच्या नावावर गावेच्या गावे उद्ध्वस्त करायचे आणि परप्रांतियांना आपली भूमी देऊन टाकायची, असे मनसुबे असणाऱ्यांना हद्दपार करा.www.konkantoday.com