दोन सख्ख्या भावांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी २० हून अधिक गुरख्यांची कसून चौकशी
गोळप मुस्लिमवाडी येथे आंबा बागेत गुरखे असलेल्या दोन सख्ख्या भावांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी २० हून अधिक गुरख्यांची कसून चौकशी केली. मंगळवारी खुनाची घटना समोर आल्यानंतर आजुबाजूच्या परिसरातील गुरख्यांना पोलिसांकडून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अद्यापही पोलिसांना मारेकऱ्यांचा शोध लागला नसून लवकरच या खुनाचा होईल उलगडा, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर हे खुनाचा तपास करत आहेत.भक्त बहादुर थापा (७२) आणि खडकबहादुर थापा (६५, दोन्ही रा. मूळ नेपाळ, सध्या आंबा बाग, गोळप) अशी दोन्ही मृत भावांची नावे आहेत. गोळप ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुस्लिम मोहल्ला येथील मुदस्सर मुकादम यांच्या मालकीच्या आंबा बागेत राखणीसाठी आलेल्या या दोन सख्ख्या भावांचा खून झाल्याचा प्रकार समोर आला होता. कोणत्या तरी धारदार शस्त्राने वार करून अंगावर दगड टाकून चेचल्याचेही दिसून आले होते.खुनाचा तपास करताना पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी करण्यात येत आहे. मुकादम यांच्या बागेचा परिसर मोठा असल्याने त्या ठिकाणी गुरख्यांची संख्या देखील जास्त आहे. अशा परिस्थितीत या दोन भावांचे कुणाशी भांडण झाले होते का? पैशाचा काही व्यवहार कुणाशी झाला होता का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. www.konkantoday.com