
लोकसभा निवडणुकांचा प्रचार आता शिगेला, प्रचारसभा, बैठकांना गर्दी दाखविण्यासाठी पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांची कसरत
लोकसभा निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. काही उमेदवारांनी कॉर्नर सभा, गाव बैठका यांच्यावर जोर दिला आहे. मात्र वाडत्या उष्म्याने हैराण झालेले मतदार या सभा, बैठकांना येणे टाळत आहेत. त्यामुळे गर्दी दाखविण्यासाठी संबंधित पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.ग्रामीण भागात सध्या भाजवळीची कामे सुरू झालेली आहेत. घरांची शाकारणी, पावसाळी बेगमीची कामे सुरू झालेली आहेत. अगोदरच वाढते तापमान व उष्मा, पाणीटंचाई अशा समस्यांमुळे हैराण झालेले सर्वसामान्य लोक कासावीस झाले आहेत. घरातील शेतीची कामे रखरखीत उन्हातून करणे शक्य होत नाहीत. अशावेळी ही कामे सकाळ सत्रात नाहीतर संध्याकाळच्या सत्रात करावी लागतात. वाढत्या उष्म्यामुळे गावोगावी प्रचाराला फिरणारे किंवा सभा, बैठक घेणारे उमेदवार, नेते मंडळी संध्याकाळची वेळच पसंत करत आहेत. अशावेळी गर्दी जमवायची कशी, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलेला दिसून येत आहे.www.konkantoday.com