लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी कर्मचारी, अधिकारी तसेच मतदान यंत्रांची ने-आण करण्यासाठी रत्नागिरी विभागातून २२५ बसेस आरक्षित.
रत्नागिरी:-* लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी कर्मचारी, अधिकारी तसेच मतदान यंत्रांची ने-आण करण्यासाठी दोन दिवसांसाठी रत्नागिरी विभागातून २२५ एसटी बसेसचे आरक्षण करण्यात आले आहे. मतदानासाठी जाणाऱ्या पथकांना जिल्ह्यातील मतदान केंद्रांपर्यंत दि. ६ मे रोजी नेऊन सोडणे व दि. ७ मे रोजी निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांना परत घेऊन येण्यासाठी या बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत.रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये दि.७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला असून मतदानापूर्वी आवश्यक असलेली तयारी सुरू आहे. कर्मचारी-अधिकारी प्रशिक्षण, ईव्हीएमवर मतपत्रिका सिलिंग करणे, मतपत्रिका गावातून वाटण्याची कामे सुरू आहेत. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. स्टाँगरूममध्ये ईव्हीएम युनिट ठेवली असून त्याचेही वितरण करण्यात येणार आहे. मतदानापूर्वी प्रशासनाने बहुतांश तयारी पूर्ण केली आहे. निवडणुकीच्या कामात व्यत्यय येऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी एसटी महामंडळाकडे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी २२५ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या प्रशासनाकडून देण्यात आली. मतदानासाठी कर्मचारी, अधिकारी, ईव्हीएम मशीनची ने-आण करण्यासाठी एसटी बसेसची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती. विधानसभा मतदारसंघ निहाय बसेसचे आरक्षण करण्यात आले असून दि. ६ व ७ रोजी उपलब्ध केल्या जाणार आहे. तत्पूर्वी कर्मचारी प्रशिक्षण सुरू असून त्यासाठीही मागणीनुसार बसेस उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली आहे.www.konkantoday.com