
आमदार योगेश कदम यांनी घेतला कोरोना प्रादुर्भावाचा ऑनलाईन आढावा
अधिकारी आणि डॉक्टर्सना महत्वाच्या सुचना; नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
खेड : खेड दापोली मंडणगड तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकारी आणि डॉक्टर्स यांची बैठक घेऊन अधिकारी व डॉक्टर्सना आवश्यकता त्या सुचना केल्या. स्वत: कोरोना पॉझिटिव्ह असलेले आमदार योगेश कदम हे मुंबईत रुग्णालयात उपचार घेत आहेत. असे असतानाही ते आपल्या मतदार संघात सातत्याने संपर्क ठेवून कोरोना विषयक उपाययोजना व नियमांचे पालन करण्याचे आवाहन व्यापारी व नागरिकांना करत आहेत.
गेल्या काही दिवसात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्याच दरम्यान आमदार योगेश कदम यांना कोरोनाची लागण झाल्याने ते रुग्णालयात अडकून पडले आहेत. मात्र रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे सारे लक्ष
आपल्या मतदार संघाकडे लागून राहिले आहे. कोरोनाचा एकंदरीत आढावा घेण्यासाठी त्यांनी १२ एप्रिल रोजी रुग्णालयातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एका बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीला मतदार संघातील प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी तसेच मतदार संघातीलडॉक्टर्स उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी अधिकारी आणि डॉक्टर्स यांच्याकडून कोरोनाबाबतचा संपुर्ण आढावा घेतला. कोरोनाला रोखण्यासाठी जी लढाई सुरु आहे ती आपली सर्वांची लढाई आहे आणि ही लढाई आणि सगळ्यांनी मिळून लढूया असे आवाहन त्यांनी या बैठकीदरम्यान केले.
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये महिलांच्या प्रसुतीच्या सर्व सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. महिला ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्याच ठिकाणी त्यांची प्रसुती झाली तर गरोदार मातांच्या समस्या कमी होतील असे त्यांनी
यावेळी सांगितले.
लसीकरण केंद्र बंद पडल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली, ते म्हणाले, केंद्र सरकारने आपल्याला लसी कमी दिल्या असल्याने लसीकरण करण्यामध्ये अडचणी येत आहेत. जी लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत ती केंद्र लसीच्या तुटवड्यामुळे बंद पडली आहेत. मी लवकरच याबाबत पाठपुरावा करून बंद पडलेली लसीकरण केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न करेन असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
www.konkantoday.com