
राजापूर येथे अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवणार्या संशयिताला जामीन
राजापूर येथे १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचा आरोप असलेल्या तरूणाची सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. प्रथमेश पोपट उर्फ बाळू चव्हाण (१८, रा. चिपळूण) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध नाटे पोलिसांनी भादंवि कलम ३७६ व पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीची प्रथमेश याच्यासोबत सोशल माध्यमावर ओळख झाली होती. या ओळखीतून प्रथमेश याने पीडितेला लग्न करण्याचे आश्वासन देवून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी पीडिता व प्रथमेश हे आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाले.यानंतर दोघेही महाबळेश्वर येथे निघून गेले. पीडितेच्या तक्रारीनुसार महाबळेश्वर येथे दोघांमध्ये शरीरसंबंध प्रस्थापित झाले. पीडिता ही आरोपी याच्यासोबत असल्याची माहिती समजताच त्या दोघांनाही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. तसेच पीडितेला फूस लावून पळवून नेणे व तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी प्रथमेशविरूद्ध भादंवि कलम ३६३, ३७६ व बालकांच्या लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच प्रथमेशला नाटे पोलिसांकडून अटक करण्यात आली.आरोपीच्यावतीने न्यायालयापुढे सांगण्यात आले की, प्रथमेश हा निर्दोष असून त्याला नाहक या प्रकरणात गोवण्यात आले आहे. आरोपी हा केवळ १८ वर्षांचा असून त्याचा गुन्हेगारी पूर्वइतिहास नाही. त्याची जामिनावर मुक्तता केल्यास तो पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करेल, तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या अटी शर्थींचे पालन करेल, असे सांगण्यात आले. तर सरकारी पक्षाकडून प्रथमेशच्या जामीन अर्जाला विरोध करण्यात आला. प्रथमेशविरूद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे सांगण्यात आले तसेच आरोपीला जामिनावर मुक्त केल्यास तो पीडितेला धमकावू शकतो. तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करेल, असे सांगण्यात आले. न्यायालयाने प्रथमेशला जामीन अर्जावर निकाल देताना सांगितले की, प्रथमेश हा केवळ १८ वर्षांचा आहे. त्याला अधिक काळ जेलमध्ये ठेवल्यास त्याचा सराईत गुन्हेगारांशी संबंध येवू शकतो. गुन्ह्याचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. वरील सर्व बाबी लक्षात घेता आरोपीला जामीन देण्यात येत असल्याचे न्यायालयाच्यावतीने सांगण्यात आले. www.konkantoday.com