निवडणूक काळात सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे जिल्ह्यात तब्बल ५.८७ लाख लिटर बेकायदा दारूसाठा सापडला.
*निवडणूक काळात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत बेकायदा दारू जप्त करण्यात आली असून सर्वाधिक तसेच सगळ्यात कमी दारू ज्या जिल्ह्यातून पकडली गेली, ते ऐकून धक्काच बसेल.अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत एकूण ४४.३४ लाख लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे तर त्याची एकूण किंमत ३४.७८ कोटी आहे. संपूर्ण राज्यात असा एकही जिल्हा नाही तिथून अवैध दारू पकडली गेली नाही. राज्य निवडणूक कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सगळ्यात कमी अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे तो जिल्हा म्हणजे राज्याची राजधानी मुंबई शहर. मुंबईतून केवळ १,०९६ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर हिंगोली जिल्हा असून या जिल्ह्यात ४,८७१ लिटर दारू साठा जप्त करण्यात आला तर तिसऱ्या क्रमांकावर परभणी जिथून ८,४९० लिटर बेकायदा दारू जप्त केली गेली. खरी धक्कादायक माहिती सर्वाधिक दारू साठा कुठे सापडला ही आहे. राज्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले शहर पुणे, या जिल्ह्यात तब्बल ५.८७ लाख लिटर बेकायदा दारूसाठा सापडला आहे तर त्या खालोखाल ठाणे शहर जिथे ५.६० लाख लिटर दारू पकडली गेली. तर तिसरा क्रमांक जळगावचा लागतो, जिथे ३.२० लाख लिटर दारू मिळाली.*८८ कोटीचे सोने, चांदी जप्त*याशिवाय अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत २१६.४७ कोटी रुपये किमतीचे १३.६९ लाख ग्रॅम अमली पदार्थ (ड्रग्स) पकडण्यात आले आहे. तसेच ८८.३७ कोटी रुपये किमतीच्या ३.२९ लाख ग्रॅम मौल्यवान धातू म्हणजेच सोने, चांदी पकडले गेले. ही कारवाई १ मार्च २०२४ पासून २२ एप्रिल २०२४ या कालावधीत करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक कार्यालयाने दिली. www.konkantoday.com