
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रेल्वेने साडेतीन लाख पर्यटक कोकणात.
नववर्ष स्वागताचे कोकणातील समुद्र किनार्यांसह गोव्याच्या दिशेने जाणार्या पर्यटकांमुळे कोकण मार्गावर धावणार्या नियमित गाड्यांसह हिवाळी स्पेशल गाड्यांचे आरक्षण ५ जानेवारीपर्यंत हाऊसफुल्ल झाले आहे. आरक्षित तिकिटे मिळणं अशक्य झाले आहे. आतापर्यंत साडेतीन लाख पर्यटक रेल्वेगाड्यांनी कोकणात दाखल झाले असून पर्यटकांनी रेल्वेगाड्यांना सर्वाधिक पसंती दिली आहे. विकेंडमुळे शनिवारपासून रेल्वेगाड्यांना आणखी गर्दी उसळणार आहे.
नववर्ष स्वागतासाठी गोव्याला जाणार्या पर्यटकांमुळे नियमित गाड्यांचे आरक्षण यापूर्वीच फुल्ल झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून नियमित गाड्या विक्रमी गर्दीने धावत आहेत. कोकण मार्गावरून धावणार्या नियमित गाड्यांसह हिवाळी स्पेशलला यापूर्वीच रिग्रेट मिळाला आहे. कोकणात दाखल होणार्या पर्यटकांची लक्षणीय संख्या लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी मुंबई-करमाळी, एलटीटी-कोच्युवेली, पुणे-करमाळी, एलटीटी-करमाळी आदी ४ हिवाळी स्पेशल गाड्या जाहीर करताच काही क्षणातच आरक्षण हाऊसफुल्ल झाले.
पर्यटकांच्या हाती प्रतीक्षा यादीवरीलच तिकिटे पडल्याने कोकणासह गोवा गाठायचे कसे, असा प्रश्न आजमितीसही सतावत आहे. रेल्वे प्रशासनाने ४ हिवाळी स्पेशल व्यतिरिक्त अन्य स्पेशल गाड्या अद्यापही जाहीर केलेल्या नाहीत. याशिवाय रेल्वेगाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही.www.konkantoday.com