खोदाई न करताच कातळावर पाइपलाइन नवालेवाडी पाणीयोजना; सखोल चौकशीची मागणी
संगमेश्वर तालुक्यात जलजीवन योजनेंतर्गत झालेल्या कामांच्या अनेक तक्रारी आता समोर येत आहेत. खोदाई न करताच कातळावर पाइपलाइन टाकण्यात आल्याचा प्रकार वायंगणेतील नवालेवाडी येथे पुढे आला आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत असलेल्या या कामाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे.वायंगणे येथील नवालेवाडीत जलजीवन मिशन योजनेंतर्गत झालेले काम दर्जेदार नसल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप आहे. नियमाप्रमाणे काही फुटांवर खोदाई केल्यानंतर पाइपलाइन टाकणे बंधनकारक आहे; मात्र तसे न करताच येथील कातळावरून पाइपलाइन टाकण्यात आली आहे. या योजनेतील कामाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. यामध्ये अधिकाऱ्यांकडूनच दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थ नाराज आहेत. या प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेणार आहेत. योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या का, याची माहिती मागवण्यात येणार आहे अशी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ राज्याचे जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांनी सांगितली. माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाच्यावतीने, सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने व गावातील दक्ष नागरिकांच्या माध्यमातून शासनदरबारी पाठपुरावाही सुरू असतो; मात्र प्रशासकीय अधिकारी दाद देत नाहीत त्यामुळे संबंधितांवर कार्यवाही होत नसल्याचे त्यांनी सांगितले. www.konkantoday.com