रत्नागिरीतील पाणी गळती थांबवा, एमआयडीसीचे माजी स्थापत्य अभियंता केशव भट यांची टीका
शहर पाणी पुरवठा योजनेची गळती थांबवण्यासाठी उपाययोजना नाही, नियोजन नाही म्हणून लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे अशी टीका एमआयडीचे माजी स्थापत्य अभियंता केशव भट यांनी केली.ते म्हणाले, गतवर्षी पाऊस ऑक्टोबर अखेरपर्यंत होता. त्यावेळी धरण पूर्ण भरलेलं होतं. पावसाळा संपल्यानंतर डोंगर खोर्यातून नदीपर्यंत येणारे असंख्य नाले, झरे डिसेंबरअखेरपर्यंत प्रवाही असतात. जानेवारी ते १५ जूनपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागते. रत्नागिरी नगर परिषदेची पाणीपुरवठा योजना आता कागदोपत्री पूर्णपणे कार्यान्वित नसली तरी ९० टक्के पूर्ण आहे परंतु नागरिकांना दररोज २४ तास सोडाच पण प्रत्यक्षात तीन तास इतकेच पाणी मिळते. ही वस्तुस्थिती आहे. त्यातच दर सोमवारी वीज नसते. या नावाखाली पाणी मिळत नाही. नगर परिषदेने त्यासाठी जनरेटर घेतले आहेत ते कशासाठी? हा प्रश्न उभा आहे.ते पुढे म्हणाले, नवीन पाणीपुरवठा योजनेतील ठिकठिकाणच्या गळत्यांमधून वाया जाणारे लाखो लीटर पाणी अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रे, सोशल मिडियामधून वाचायला मिळतात. मात्र उपाययोजना होताना दिसत नाही. नगर परिषदेचे पाणी अभियंता, मुख्य अभियंता व मुख्याधिकारी यांच्याकडे दररोज धरणातील किती पाणी उपसले जाते आणि त्यापैकी किती पाणी नागरिकांना पुरविले जाते याची नोंद नाही. मागील किमान १५ ते २० वर्षे साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्रातील गळतीचे पाणी स्टेट बँक कॉलनीसमोरील गटारातून वाहून जात आहे. ती गळती थांबवण्याचे काम नगर परिषदेचे मुख्याधिकारी कधी करणार? असा प्रश्न सर्व आणि माजी नगरसेवक, नगराध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी यांना पडत नाही, अशी टीका केशव भट यांनी केली आहे.www.konkantoday.com