
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून एकवीस लाख रुपये बक्षीस जिंकण्याचे आव्हान
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून एकवीस लाख रुपये बक्षीस जिंकण्याचे आव्हान दिले आहे. त्यासाठीची आव्हान प्रक्रिया व प्रश्नावली देखील महाराष्ट्र अंनिसने जाहीर केली आहे.हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या राजकीय अभ्यासकांना नाही तर ज्योतिष्यशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना आहे.जे ज्योतिषी या आव्हान प्रक्रियेत सहभागी होतील, त्यांना समितीमार्फत एक प्रश्नावली दिली जाईल. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये टी. शैलजा, नितीन गडकरी, राहुल गांधी, महुआ मलहोत्रा, कंगना राणावत यांना किती मते पडतील? तसेच कलकत्ता उत्तर, नालंदा, रायपूर, बारामती, आग्रा, बेल्लारी या मतदार संघातून कोण विजयी होईल? वाराणसी, बुलढाणा, चांदणी चौक, लडाख, वेल्लोर, भुवनेश्वर या मतदारसंघात सगळ्यात कमी मते कोणाला पडतील?संपूर्ण भारतात सर्वांत कमी मते कोणत्या उमेदवाराला पडतील ? कोणत्या मतदारसंघात नोटाला जास्त मतदान होईल ? पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्य किती उमेदवारांना मिळेल? आदी प्रश्नांचा समावेश आहे, अशी माहिती डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, सम्राट हटकर, रामभाऊ डोंगरे, मिलिंद देशमुख, प्रकाश घादगिने, विनोद वायगणकर, प्रवीण देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. तसेच राजकीय भविष्य सांगण्यासाठी कोणती ज्योतिष पद्धत वापरली यांची माहिती ज्योतिषांनी देणे त्यावश्यक आहे.या आव्हान प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रवेशिका, उत्तरासहित अधिकृत प्रश्नावली आणि ‘अंधश्रध्दा निर्मूलन समिती, महाराष्ट्र’ या नावे काढलेला रूपये पाच हजार रुपयांचा प्रवेश शुल्काचा धनाकर्ष (डी.डी.) सीलबंद पाकीटातून २५ मे २०२४ पर्यंत रजिस्टर पोस्टाने कार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर, सांगली – 416416. फोन नंबर – 0233-2312512 पत्त्यावर मिळणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाने अधिकृतपणे सर्व निकाल त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केल्यानंतर दोन आठवडयाच्या आत परीक्षक समितीच्यावतीने योग्य तो अधिकृत निकाल जाहीर करण्यात येईल.www.konkantoday.com