ट्रॅक्टरचा गिअर न पडल्याने ट्रॅक्टर मागे आल्याने झालेल्या अपघातामध्ये विजापूर येथील 35 वर्षीय कामगाराचा मृत्यू.
* राजापूर तालुक्यातील पेंडखळे येथील निनावेवाडी ते वैतागवाडी दरम्यानच्या रस्त्यावर चढावाला ट्रॅक्टरचा गिअर न पडल्याने ट्रॅक्टर मागे आल्याने झालेल्या अपघातामध्ये विजापूर येथील 35 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. करीअप्पा लिंगप्पा यवतनाट (रा. गुब्याड, ता.सिनगी, जि.विजापूर) असे मयताचे नाव असून याप्रकरणी ट्रॅक्टर चालक विजय चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली. शुक्रवार दि.19 एप्रिल रोजी रात्री 9.30 च्या दरम्यान ही घटना घडली.या प्रकरणी राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजापूर येथील करीअप्पा यवतनाट व नाटू चव्हाण हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत पेंडखळे ते धनगरवाडी रस्त्याच्या कामासाठी आलेले होते. ते पेंडखळे वैतागवाडी येथे रस्त्याच्या कडेला झोपडी बांधून राहत होते. शुक्रवारी सायंकाळी सर्व कामगार काम आटोपून आपल्या झोपड्यांमध्ये परतल्यानंतर करीअप्पा यवतनाट व नाटू चव्हाण हे जळावासाठी लागणारी लाकडे आणण्यासाठी ट्रॅक्टर घेवून गेले. नाटू चव्हाण हा ट्रॅक्टर चालवत होता. रात्री 9.30 च्या सुमारास लाकडे घेवून निनावेवाडी ते वैतागवाडी रस्त्यावरून येत असताना चढावावर ट्रॅक्टरचा गिअर न पडल्याने गाडी अचानक मागे आली.यामध्ये करीअप्पा हा ट्रॅक्टरमधून खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला, तोंडाला तसेच हाताला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक विजय चव्हाण याने घटनास्थळावरून पळ काढला. अन्य कामगारांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून करीअप्पा याला राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.www.konkantoday.com