सुरत लोकसभा निवडणुक भाजपा चे मुकेश दलाल बिनविरोध
देशभरात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. गेल्या शुक्रवारी म्हणजे १९ तारखेला पहिल्या टप्प्यासाठी १०२ मतदारसंघात मतदान झाले. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. संपूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. त्याआधी देशातील एका लोकसभा मतदारसंघातील निकाल जाहीर झाला आहे.भाजपने गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. पक्षाचे उमेदवार मुकेश दलाल यांची या मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यानंतर या मतदारसंघातून मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार शिल्लक राहिले, ज्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली. निवडणूक आयोगाकडून याची लवकरच घोषणा केली जाईल.सुरत लोकसभा मतदारसंघातून पहिल्याच दिवशी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने येथील समीकरण बदलून गेले. त्यानंतर बीएसपीचे उमेदवार प्यारे लाल भारती यांनी देखील अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतला.मुकेश दलाल हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष सीआर पाटील यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जाता. सुरत लोकसभा मतदारसंघात बिनविरोध निवड झालेले ते पहिले खासदार ठरले आहेत. सुरतमधून अन्य कोणीच उमेदवार नसल्याने अखेर मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून याची लवकरच घोषणा केली जाणार आहे. आता गुजरातमधील लोकसभेच्या २५ जागांसाठी सात मे रोजी मतदान होईल.काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र त्यासंदर्भात अद्याप कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख संपुष्टात आल्याने मुकेश दलाल विजयी झाले आहेत.www.konkantoday.com