जास्त मुले कुणाला होतात आणि कमी मुले कुणाला होतात, हे मोदींना कसे कळते ते देवजाणे-उद्धव ठाकरे
नरेंद्र मोदी आता देशाचे काळजीवाहू पंतप्रधान आहेत. ते सध्या त्यांच्या पक्षाची काळजी घेत आहेत. त्यांना परत सत्तेवर येणार नाही, याची भीती भेडसावत आहे. राज्यात प्रचारासाठी वारंवार येत आहेत, गल्लीबोळात फिरत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केली.काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित इंडिया आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, आमदार यशोमती ठाकूर, माजी मंत्री अनिल देशमुख, डॉ. सुनील देशमुख आदी उपस्थित होते.उद्धव ठाकरे म्हणाले, आज जे सत्तेवर बसले, त्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता. नरेंद्र मोदी सतत काँग्रेसवर टीका करतात. काँग्रेस सत्तेवर आली, तर ज्यांना जास्त मुले होतात, त्यांना सर्व संपत्ती वाटून टाकेल, असे ते काल आपल्या भाषणात म्हणाले. तुम्ही दहा वर्षे सत्तेत होतात, कमी मुले होणाऱ्यांना संपत्ती का नाही वाटली. जास्त मुले कुणाला होतात आणि कमी मुले कुणाला होतात, हे मोदींना कसे कळते ते देवजाणे. दहा वर्षे तुम्ही सत्तेवर होतात, आम्हीच मूर्ख होतो, तुम्हाला सत्तेवर पोहचून दिले. पंधरा लाख रुपये येणार होते, ते अजून आलेले नाहीत. ही निवडणूक शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाची लढाई आहे. स्वातंत्र्यात लढायचे की पारतंत्र्यांत हे आपल्याला ठरवावे लागणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.www.konkantoday.vom