
रत्नागिरीमध्ये मला येण्याचे निमंत्रण मिळाले, हे माझं भाग्य समजत नाही तर हा माझा हक्क समजतो-रघुजीराजे आंग्रे
आज साडेतीनशे वर्षानंतरही छत्रपतींचा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अगदी जगभरात जयजयकार केला जातो. आपल्यावर आक्रमण शारीरिक व वैचारिकही होत आहे. खोटा इतिहास सांगितला जातोय. आपण खरा इतिहास गांभिर्याने अभ्यासला पाहिजे. भूतकाळातील चुका पुन्हा घडता कामा नयेत, असेही प्रतिपादन सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे म्हणाले.
अखिल मराठा फेडरेशनतर्फे विवेक हॉटेल येथे दोन दिवसीय मराठा महासंमेलनाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी मंचावर अखिल मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश सुर्वे, शिवव्याख्याते प्रा. नामदेवराव जाधव, माजी आमदार बाळ माने, विविध मराठा मंडळाचे पदाधिकारी संतोष घाग, अविनाश राणे, जी. एस. परब, दिलीप जगताप, राजेंद्र सावंत, राकेश नलावडे, प्रकाश देशमुख, श्री. शेंगडे पाटील, अजित साळवी, महेश सावंत आदी उपस्थित होते.रघुजीराजे आंग्रे म्हणाले की, समुद्रमार्गे कसाब व आतंकवादी घुसले. त्यांना दोन दिवस मारण्यासाठी आपले पोलिस झुंजत होते.
अज्ञात लोक घुसल्याची माहिती एका आजीने दिली होती. पण त्यावेळी कारवाई झाली नाही. मग आपण आतंकवादाच्या विरुद्धची लढाई जिंकलो असं समजायचं का? पूर्वी खैबर खिंड व सागरी मार्गेच शत्रू येत होते. त्यामुळे आजही किनारी सुरक्षा देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.रघुजीराजे आंग्रे म्हणाले की, रत्नागिरीमध्ये मला येण्याचे निमंत्रण मिळाले, हे माझं भाग्य समजत नाही तर हा माझा हक्क समजतो. कारण माझ्या पूर्वजांची ही कर्मभूमी आहे, इथे येण्यासाठी मला कुठल्याही प्रकारच्या निमंत्रणाची आवश्यकता नाही.
कोकण किनारपट्टी ही माझ्या पूर्वजांनी त्यांच्या रक्तांनी संचित केलेली भूमी आहे. इथे येणं, समाजबांधवांना भेटणं त्यांच्याबरोबर व्यक्त होणं, हे मी माझ्या पूर्वजांबरोबर जोडलेली नाळ समजतो. मी आज त्या ऋणानुबंधातून इथे उभा आहे.ते म्हणाले की, शाहू, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. मग छत्रपती शिवाजी महाराज उसने आले होते का? शिवाजी महाराजांसारखं नररत्न आपल्याला दिलं त्या मायभूमीच्या ऋणातून उताराई व्हायला हवं. महाराष्ट्राचा सातबारा कोणाच्याही नावावर बांधला जाऊ शकत नाही. ही आपली पुण्यभूमी, कर्मभूमी, जन्मभूमी महाराष्ट्र भूमी आहे. त्या भूमीच्या ऋणातून उतराई व्हायचं असेल तर आपल्याला सर्वांना आपल्या कर्तव्यपदावर, सतत एकनिष्ठेने कार्यरत राहावं लागेल.
आईच्या ऋणातून कधीही कोणी मुक्त होत नाही.अखिल मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश सुर्वे यांना यांना रघुजीराजे आंग्रे आणि शिवव्याख्याते प्रा. नामदेवराव जाधव यांच्या हस्ते कोकणरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अखिल मराठा फेडरेशनमधील देशातील ५७ मराठा मंडळांच्या प्रतिनिधींनी या संमेलनात सहभाग घेतला.
हे महासंमेलन यशस्वी करण्यात व सामाजिक योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. रत्नागिरीत शिवजयंतीच्या शोभायात्रेला पाच हजार मराठा बांधवांनी उपस्थित राहून न भू तो न भविष्यती कार्यक्रम करण्याचे आवाहन सुर्वे यांनी केले. तसेच पुढील महासंमेलन मालवण, अक्कलकोट येथे करण्याबाबत मराठा मंडळाची मागणी असल्याचे सांगितले.