साखरपा परिसरात गडगडाटासह पाऊस
साखरपा गाव आणि परिसरात आज पहाटे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे बागायतदारांमध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे. गेले दोन दिवस या परिसरात मोठ्या प्रमाणावर तापमानवाढ जाणवत होती. दिवसाच्या तापमानात मोठी वाढ झाली होती. त्याचा परिणाम म्हणून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. गुरूवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास अचानक गडगडाट सुरू होऊन पावसाला सुरवात झाली.गडगडाटासह विजाही होत होत्या. सुमारे १५ मिनिटे मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरात पडला. साखरपा गाव तसेच कोंडगाव, मेढे, दाभोळे, कनकाडी, मोर्डे या गावांमध्ये हा पाऊस पडला. दाभोळे, कनकाडी, मेघी, मोर्डे या गावांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या भाजावळी अद्याप बाकी होत्या. आज झालेल्या पावसामुळे शेतात उतरलेले कवळ, पातेरा आणि गवत भिजून गेले आहे. त्यामुळे उर्वरित भाजावळींसाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. www.konkantoday.com