
आरजीपीपीएल कंपनीने ३ वर्षाचा कर ग्रामपंचायतीला देण्याचे जिल्हा परिषदेचे आदेश
गुहागर तालुक्यातील अंजनवेल वेलदूर रानवी ग्रामपंचायतीचा रत्नागिरी गॅस ऍण्ड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने थकवलेला गेल्या तीन वर्षांचा कोट्यावधी रुपयांचा इमारती कर या तिन्ही ग्रामपंचायतींना देण्याचा आदेश दिला असून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर कर कंपनीकडून तत्काळ वसूल करावा, अशा प्रकारचा आदेश काढला आहे.रत्नागिरी गॅस ऍण्ड पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीने अंजनवेल ग्रामपंचायत आणि रानवी ग्रामपंचायत या कार्यक्षेत्रातील इमारती कर गेले तीन वर्ष थकविला आहे. या पार्श्वभूमीवर या तिन्ही ग्रामपंचायतींनी कंपनीकडून कर वसुलीकरिता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम १२४ पाच अंतर्गत कर आकारणी वसुलीची गुहागर पंचायत समितीकडे दावा दाखल केला होता. यावर सुनावणी होवून या तिन्ही ग्रामपंचायतींच्या बाजूने निकाल लागला होता. मात्र आरजीपीपीएल कंपनीला हे मान्य नव्हते. म्हणून कंपनीने जिल्हा परिषद रत्नागिरी स्थायी समितीकडे यावर २२ ऑक्टोबर २०२१ रोजी अपील केले होते. याचा निकाल लागून तिन्ही ग्रामपंचायतींच्या बाजूने हा निकाल लागला आहे.कंपनीने आतापर्यंत कर दिला. परंतु गेल्या तीन वर्षापासून कर देण्यास नकार दिला आहे. आपली सरकारी कंपनी असून आम्ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला सदर कर देवू शकतो. मात्र ग्रामपंचायतींनी केलेली कराची मागणी ही बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. परंतु महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कंपनीला दिलेली जमीन ही सातबारा उतार्यानुसार महामंडळाच्या नावे आहे. ही जमीन महामंडळाने १२ एप्रिल २००६ रोजी भाडे कराराने कंपनीला दिलेली आहे. www.konkantoday.com