ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांच्या यांच्या ‘टिळक पर्व’ ग्रंथाला ‘लोटिस्मा’चा लोकमान्य विशेष पुरस्कार ; रविवारी वितरण होणार
चिपळूण :: ‘दैनिक केसरी’चे बारावे संपादक आणि दैनिक ‘लोकसत्ता’चे साहाय्यक संपादक आदींसह ३६ वर्षांची संपादकीय कारकीर्द भूषविणारे ज्येष्ठ पत्रकार अरविंद व्यंकटेश गोखले यांनी लिहिलेल्या ‘टिळक पर्व’ (१९१४-१९२०) या चरित्रग्रंथाला येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचा ‘लोकमान्य विशेष पुरस्कार’ जाहीर झाला असून मान्यवरांच्या उपस्थितीत येत्या रविवारी (दिनांक २१) सायंकाळी ६.०० वाजता वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी अरविंद गोखले यांची लोकमान्य चरित्रावर, वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे मुलाखत घेणार आहेत.ज्येष्ठ संपादक अरविंद व्यं गोखले यांच्या ‘टिळकपर्व’ या पुस्तकाला ज्येष्ठ विचारवंत आणि महाराष्ट्र-संस्कृतीचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी विवेचक प्रस्तावना लाभलेली आहे. या पुस्तकात टिळकांच्या आयुष्यक्रमातील शेवटच्या सहा वर्षांचा कालखंड गोखले यांनी अत्यंत साक्षेपाने मांडला आहे. ‘या पुस्तकाची तुलना टिळकांचे लेखनिक आप्पाजी विष्णू कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘लोकमान्य टिळक यांची गेली आठ वर्षे’ या पुस्तकाशी करता येईल’ असे मोरे यांनी आपल्या प्रस्तावनेत नमूद केले आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान नामवंत लेखक डॉ. तानाजीराव चोरगे भूषविणार आहेत. कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून सातारा येथील दै. ऐक्यचे माजी संपादक वासुदेव कुलकर्णी आणि चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले उपस्थित राहाणार आहेत. या संस्मरणीय कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव आणि कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.