यमराज’ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात? रेड्यावर बसून उमेदवाराची जोरदार एन्ट्री!!
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार हे चक्क रेड्यावर बसून यमराजाच्या वेशात निवडणूक अधिकारी कार्यालयात आले. देशातील वाढता भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपणांस संसदेत जायचे आहे. म्हणून लोकसभा लढविण्याचे ठरविल्याचे यमराजाच्या रूपाने उमेदवारी दाखल केलेले अपक्ष उमेदवार राम गायकवाड यांनी सांगितले.ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण मिळावे, वाढत्या भ्रष्टाचारावर आळा बसावा आणि सत्ताधारी पक्षाकडून ईडी व अन्य तपास यंत्रणांचा होणारा गैरवापर टाळावा, यासाठी आपण यमराज बनून येत असल्याचे राम गायकवाड यांनी सांगितले. माढा लोकसभेसाठी उमेदवारी भरण्याकरिता यमराजाच्या पोशाखात रेड्यावर बसून सात रस्त्यावरील जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या राम गायकवाड यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. या यमराजासोबत सुमारे शंभर कार्यकर्त्यांचा सहभाग होता.माढा लोकसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात प्रतिष्ठेची लक्षवेधी लढत होत आहे. याच मतदारसंघात यमराज बनून राम गायकवाड यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. प्रसिध्दीचा अनोखा फंडा म्हणून यमराजाने ही शक्कल लढविल्याचे मानले जाते.www.konkantoday.com