मतदानासाठी चाकरमानी येणार कोकणात रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. कामानिमित्त मुंबईत असलेला चाकरमानी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. ७ मे या दिवशीच्या कोकण रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. तर महत्वाच्या गाड्यांची प्रतीक्षा यादी २०० च्या पार झाली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने कोकणात दाखल होणारा चाकरमानी कुणाच्या पारड्यात आापले मत टाकणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी मिळाली आहे. तर महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. दोन दिवसात महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. www.konkantoday.com