
इंग्रजी माध्यमाचेच शिक्षक देणार इंग्रजीचे धडे’, शासनाचे परिपत्रक
राज्यात शिक्षक भरती झालेली नसल्याने अनेक शाळांना पुरेसे शिक्षक नाहीत. अशा परिस्थितीत राज्य शासनाने आता केंद्र शाळा स्तरावर अन्य शाळांतील शिक्षकांना इंग्रजी शिकविण्यासाठी इंग्रजी माध्यमातील शिक्षण अत्यावश्यक केले आहे.तसा शासन निर्णयही निर्गमित केला आहे. यामुळे शाळांमधील रिक्त जागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मराठी शाळांसाठी हे धोकादायक असल्याचा आरोप करीत शिक्षक संघटनांनी याला विरोध केला आहे.
शिक्षक भरतीमध्ये केंद्र शाळांसाठी इंग्रजी माध्यमातील पदवीधरांना राखीव कोटा ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पवित्र पोर्टलद्वारे केंद्र स्तरावर निवडल्या जाणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून असले पाहिजे, अशी अट लागू करण्यात आली आहे. परिपत्रकानुसार केंद्र शाळा स्तरावर अन्य शाळांतील शिक्षकांना इंग्रजी भाषेचे तंत्र शिकवण्यासाठी संधी दिली जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी केंद्र स्तरावर इंग्रजी अध्यापनात सुधारणा होण्यासाठी साधन व्यक्ती नेमून शिक्षकांना इंग्रजीचे धडे देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे शिक्षकांचे इंग्रजीमधून अध्यापनाबाबतचे तंत्र विकसित होऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारेल. परिणामी शाळांत पटसंख्या वाढेल, असे परिपत्रकात म्हटले आहे.
www.konkantoday.com